Observer Research Foundation Mumbai

Ideas and Action for a Better India

सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र (महाराष्ट्र@५०) अभ्यासकेंद्राचे उद्घाटन

 
 

दि. २४ जून, २०१० रोजी, शिवराज्याभिषेकाच्या सुमुहूर्तावर आणि महाराष्ट्र गीताच्या आवेशपूर्ण सुरांच्या साथीने ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मुंबईच्या सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र (महाराष्ट्र@५०) या अभ्यासकेंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि पत्रकार डॉ. अरूण टिकेकर यांच्या हस्ते झाले. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ओ.आर.एफ.) हा सार्वजनिक धोरणाच्या क्षेत्रात काम करणारा विचारमंच (Think Tank) असून तो नवी दिल्ली येथे गेली २० वर्षे कार्यरत आहे. जानेवारी २०१० पासून मुंबईमध्ये ओ.आर.एफ. च्या कार्याची सुरुवात झाली असून शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, युवा-विकास, नागरी विकास, सर्वसमावेशक विकास आणि भारतीय संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन या बृहत्‌ क्षेत्रात तो कार्यरत आहे.

    या वर्षी आपण महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहोत. दुर्दैवाने सभोवतालचे चित्र खूप निराशाजनक आहे. देशामध्ये महाराष्ट्राचे योगदान नेहमीच महत्त्वाचे राहिले असून हिमालयावर (भारतावर) जेव्हा संकट येते तेव्हा सह्याद्री (महाराष्ट्र) मदतीस धावून जातो अशी आपल्या राज्याची ख्याती आहे. एकेकाळी अटकेपार झेंडा रोवणारा आणि पुरोगामी विचार आणि दूरदर्शी नेतृत्त्वाने संपूर्ण समाजास योग्य दिशा दाखवणारा महाराष्ट्र आज नैराश्याच्या गर्तेत सापडलेला आढळून येतो.   

 मुंबईमध्ये काम करत असताना महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात, राज्याच्या विकासासाठी आपलेही काही योगदान असायला हवे या विचारातून महाराष्ट्र@५० केंद्राच्या निर्मितीची संकल्पना रुजली. ओ.आर.एफ. च्या उपक्रमांत सहभागी झालेल्या श्रीमती ज्ञानदा देशपांडे, श्री. माधव भांडारी, श्री. अनिल शिदोरे, श्री. गिरीष कुबेर, श्री.अशोक दातार, श्री. चंद्रहास देशपांडे अशा अनेक मान्यवरांशी झालेल्या चर्चेतून ती विकसित झाली.

  ज्येष्ठ समाजसेवक आणि हिवरेबाजार या आदर्श गावाचे सरपंच म्हणून जगभर नावलौकिक मिळवेलेल्या श्री. पोपटराव पवारांच्या ‘सर्वांगीण ग्रामीण विकास आणि उद्याचा महाराष्ट्र’या विषयावरील व्याख्यानाने महाराष्ट्र@५० या केंद्राच्या उपक्रमांची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. अनय जोगळेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. निनाद आजगावकर यांनी आपल्या साथिदारांसह सुरेल आवाजात महाराष्ट्र गीत सादर करून वातावरणाची निर्मिती केली. डॉ. अरूण टिकेकर यांनी दीप-प्रज्वलन करून केंद्राच्या उद्‌घाटनाची औपचारिक घोषणा केली. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात राज्याच्या विकासाचे धोरण आणि दिशा ठरवण्यात या केंद्राचा हातभार लागावा अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी ओ. आर.एफ.च्या या नवीन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. 

     त्यानंतर ओ.आर.एफ. मुंबईचे अध्यक्ष श्री. सुधींद्र कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या केंद्राच्या स्थापनेमागची ओ.आर.एफ.ची भूमिका विषद केली. भारतामध्ये लोकांशी निगडीत असणाऱ्या विषयांवर काम करणारे विचारमंच (Think Tanks) मुख्यत्त्वे इंग्रजीत काम करतात. सामान्य माणसांच्या प्रश्नांशी, त्यांच्या विचारांप्रती तसेच तळागाळात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि थोर समाजसेवकांच्या कार्याप्रती बहुतांशी विचारमंच असंवेदनशील असल्याचे दुर्दैवी चित्र आजही दिसून येते. महाराष्ट्र@५० हे केंद्र राज्याच्या विविध भागात कार्यरत असलेल्या मान्यवरांच्या सहयोगाने आणि प्रामुख्याने मराठीमध्ये काम करून ही उणीव भरून काढेल असे त्यांनी प्रतिपादन केले.    

 
 

 

महाराष्ट्राचे भारतातील स्थान आणि योगदान महत्त्वपूर्ण असल्यामुळे देशाच्या राज्याकडून मोठ्या अपेक्षा आहे. त्यांच्या पूर्ततेसाठी सक्षम नेतृत्त्वाला पर्याय नाही. असे नेतृत्त्व राजकीय क्षेत्रातून मिळेल अशा अपेक्षेमध्ये वेळ घालवण्याऐवजी महाराष्ट्रातील सर्वोत्तम विचारवंतांना आणि कार्यकर्त्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणून अभ्यासप्रकल्प, परिसंवाद, संशोधन आणि प्रकाशन यांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांच्या कार्याला चालना देण्याची गरज आहे. आजच्या कार्यक्रमासाठी डॉ. अरूण टिकेकरांच्या रूपाने एक ज्येष्ठ विचारवंत आणि श्री. पोपटराव पवारांच्या रूपाने एक कर्मयोगी आपल्यामध्ये उपस्थित आहे. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या विकासासाठी चांगल्या कल्पना आणि कृती यांची सांगड घालण्याची गरज आहे. ओ.आर. एफ. चे ब्रीदवाक्यही तेच असल्यामुळे महाराष्ट्र@५० हा विचारमंच ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करून राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये आपला खारीचा वाटा उचलेल असे प्रतिपादन श्री. कुलकर्णींनी केले.

  श्री. पोपटराव पवारांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात हिवरे बाजारच्या कायापालटावर आधारित एका लघुपटाद्वारे केली. त्यानंतर अत्यंत मनमोकळेपणाने आपले विचार मांडताना त्यांनी आपल्या आजवरच्या प्रवासाची हकिकत कथन केली. पद्‌व्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या श्री. पोपटराव पवारांनी महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, विनोबा भावे आणि अण्णा हजारे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन आपल्या गावी म्हणजे हिवरे बाजार येथे परत जाऊन गावच्या विकासात योगदान देण्याचा निर्णय घेतला. तेथून ते आजवरच्या प्रवासात त्यांना आलेल्या अडचणी, त्यावर काढलेले तोडगे, ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करताना आलेले अनुभव आणि आपल्या उपक्रमांना आलेल्या यशाने हुरळून न जाता, राजकीय क्षेत्रात शिरण्याची संधी विनम्रपणे नाकारून, आदर्श गाव योजनेचा प्रसार करण्याचा घेतलेला निर्णय अशा अनेक आठवणी त्यांनी कथन केल्या. आज हिवरे बाजार ग्रामविकास क्षेत्रामध्ये एक जागतिक आदर्श बनला असून भारतातील विविध राज्यांमधून तसेच सुमारे १२० देशांमधून विविध शिष्टमंडळांनी तसेच अभ्यासगटांनी या गावाला भेट दिली आहे. या यशोगाथेचे श्रेय आपले नसून संपूर्ण गावाचे आहे असे विनम्रपणे सांगून पोपटरावांनी सामान्य गावकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी तसेच त्यांचा उत्साह टिकून ठेवण्यासाठी केलेल्या विविध उपायांचे गमतीशीर किस्से सांगितले.  

 
झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणाच्या दुष्परिणामांबद्दल बोलताना पोपटरावांनी सांगितले की मुंबई शहराला दररोज लागणारी ३००० मेगावॅट वीज मराठवाड्याला महिन्याभरासाठी पुरवली जाते. मुंबईत प्रतिव्यक्ती २५० लिटर या दराने दररोज ३०० कोटी लिटर पाणी वापरते जे कोयना धरणाच्या महिन्याभराच्या जलसंधारणाच्या क्षमतेइतके आहे. मुंबईने पाणी टंचाई खऱ्या अर्थाने बघितलेलीच नाही. आमच्या येथे होणाऱ्या वार्षिक पर्जन्यमानाइतका पाऊस मुंबईत भर पावसाळ्यात एका दिवसात पडतो. नुकतीच मुंबई-ठाण्यात स्थायिक झालेल्या २२ कुटुंबांच्या सुमारे १०० लोकांनी हिवरेबाजारमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. या बातमीकडे उपस्थितांचे लक्ष वेधून पोपटरावांनी त्यामुळे मुंबईचे दररोज सुमारे ३०००० लिटर पाणी वाचते हे निदर्शनास आणले. हिवरे बाजारसारखी गावं महाराष्ट्रात सर्वत्र निर्माण झाल्यास वीज आणि पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होईल असे त्यांनी सांगितले.

 
आपल्या व्याख्यानानंतर पोपटरावांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. सध्याचे विकासाचे मॉडेल हे अत्यंत असंतुलित असून शहरीकरणाची गती अशीच कायम राहिल्यास भविष्यात फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल असे त्यांनी सांगितले. सहकार आणि तंत्रज्ञान यांची सांगड कशी घालायची या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी आंधश्रद्धांना दूर ठेवून सहकारामध्ये अध्यात्माचा आंतर्भाव करण्याची गरज व्यक्त केली. ओ.आर.एफ.ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे आपल्याला शहरातील श्रोत्यांपुढे आपले विचार सादर करता आले आणि त्यांच्यामध्ये या विषयांबाबत असलेल्या कुतुहलाची जाणीव आपल्याला झाली असे सांगून त्यांनी ओ.आर.एफ.चे आणि श्री. सुधींद्र कुलकर्णींचे आभार मानले. 

 

   

त्यानंतर अध्यक्षीय भाषण करताना डॉ. अरूण टिकेकरांनी कृतीशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले. क्रांती वेगाने घडून येत असली तरीही त्यामुळे घडणारा बदल खोलवर आणि शाश्वत नसतो. कोणताही सामाजिक बदल, मग तो अगदी छोटा किंवा क्षुल्लक का असेना, धीम्या गतीने घडून येत असतो. असा बदल शाश्वत असल्यामुळे त्यासाठी समाजातून होणारा विरोध पचवून परिश्रम करण्याची आणि संयम बाळगण्याची आवश्यकता असते. महाराष्ट्राचे देशातील स्थान विशद करताना डॉ. टिकेकरांनी “हिंदुस्थानात केवळ महाराष्ट्रालाच इतिहास आहे , बाकी सर्व प्रांतांना फक्त भूगोल आहे!” या आचार्य अत्र्यांच्या उद्गारांचा दाखला दिला आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवर महाराष्ट्राने नेतृत्त्व करायची गरज आहे असे प्रतिपादन केले. श्री. पोपटराव पवारांच्या व्याख्यानातून बरेच काही शिकायला मिळाले असे त्यांनी सांगितले. ओ.आर.एफ.चे अभिनंदन करून डॉ. टिकेकरांनी केंद्राच्या भविष्यातील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्रीमती राधा विश्वनाथ यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर केले.

  महाराष्ट्र या केंद्राच्या आगामी उपक्रमांविषयीची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी श्री. सुधींद्र कुलकर्णी यांच्याशी sudheenkulkarni@gmail.com किंवा श्री. अनय जोगळेकर यांच्याशी anay.joglekar@orfonline.org , ९७६९४७४६४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.@५०

  

 
 
 
 
 

 

 

 
 
 
 
 
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

Information

This entry was posted on 24/06/2010 by in Culture, Inclusive Development.
%d bloggers like this: